नवी दिल्ली : भारताने गेल्या काही दिवसांत तुकडा तांदळाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घातली. भारताच्या या निर्णयाने चीनमध्ये अन्न संकट निर्माण होवू शकते. बिजिंग हा तुकडा तांदळाचा मुख्य खरेदीदार मानला जातो. त्यामुळे चीनमधील पुरवठा अडचणीत येण्याची शक्यता आहे. चीनमध्ये तुकडा तांदळाचा वापर मुख्यत्वे नुडल्स, मद्य आणि जनावरांचा चारा म्हणून केला जातो. भारत आफ्रिकेतील काही देशांनाही तुकडा तांदूळ निर्यात करतो. मात्र, शेजारी असलेला चीन हा याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.
आज तकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के एक्स्पोर्ट ड्यूटी लागू करण्याच्या निर्णयासह देशांतर्गत तांदळाची उपलब्धता वाढविण्यासाठी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. भारतातील तांदळाच्या एकूण निर्यातीत तुकडा तांदळाचा वाटा ६० टक्क्यांचा आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार आहे. जागतिक व्यापारात याचा वाटा ४० टक्क्यांचा आहे. जगातील १५० देशांना भारतामधून तांदूळ निर्यात केला जातो. काही आफ्रिकन देशांना मुख्यत्वे तुकडा तांदळाची निर्यात केली जाते. मात्र, चीन कृषी नेटवर्कमध्ये प्रकाशित एका लेखानुसार, चीन भारताकडून तुकडा तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. चीनने २०२१ मध्ये भारताकडून १.१ मिलियन टन (११ लाख टन) तुकडा तांदूळ आयात केला. भारताने २०२१ मध्ये एकूण २१.५ मिलियन टन तांदूळ निर्यात केला होता.