चिनीमंडी आणि सायबर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय “मृदा आरोग्य आणि पिक उत्पादकता” या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कारण रासायनिक खतांचा होणारा वापर आणि त्याचे दुष्परिणाम हे आपण सध्या पाहत आहोत. ग्रामीण भागात याला मीठ फुटणे असे म्हणतात कारण अशी जमीन कोणतेही पीक घेण्यास असमर्थ असते व अशा जमिनीत काहीच पिकू शकत नाही. रासायनिक खतांमुळे पिक जलद उत्पादित केली जाऊ लागली आहेत पण त्याचे दुष्परिणाम हताश करणारे आहेत. त्यासाठी अजून एक महत्वाचे कारण म्हणजे आलटून पालटून पिक न घेणे म्हणजेच एकाच पिकाचे उत्पादन सतत काही वर्ष घेणे हा होय व त्यामुळे जमिनीचा पोत कमी होतो व सदर ची जमीन क्षारपड होते.
अशा भयावह परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा लागणार आहे, यात काही वादच नाही. प्रत्येक शेतकऱ्यांनी याकडे प्रमुख्याने लक्ष द्यावे लागणार आहे. त्याकरिता कोणत्या उपाय योजना कराव्या लागणार आहेत यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापुरातील सर्व तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतामधील माती घेऊन आले होते. यावेळी ‘आत्मा’ चे प्रकल्प संचालक श्री. बी. बी. मास्तोळी यांनी मृदा आरोग्य अभियान, तर विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी प्रा. डॉ. व्ही. एम. बुलबुले यांनी मृदा आरोग्याचा पीक उत्पादनावर होणारा परिणाम यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत झाली व शेतकऱ्यांनी याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामधून आणलेल्या मातीच्या नमुन्यांचे परीक्षण झाले व त्यांना मृदा आरोग्य कार्ड करून देण्यात आले. सायबर महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन व मातीचे प्रयोगात्मक प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या कार्यशाळेसाठी सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. एम. एम. अली, पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. कदम व जे. के. शुगर्स चे संस्थापक श्री. जितूभाई शाह व चिनीमंडी चे सह-संस्थापक श्री. उप्पल शाह यांचे मार्गदर्शन लाभले.
“आम्ही ह्या अशा शेतीपूरक कार्यशाळा संपूर्ण देशभर आयोजित करणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल”, असे मत चीनी मंडी चे सह संचालक उप्पल शाह यांनी व्यक्त केले.