सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसर चौक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उस दराच्या प्रश्नावर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली. उस दर जाहीर न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला तरी चालेल. त्यामुळे आंदोलन वेगळ्या वळणावर जावू शकेल असा इशारा कारखानदारांना आणि राज्य सरकारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला. शेळके यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारणी अर्जुनराव साळुंखे, सातारा तालुका अध्यक्ष रमेशराव पिसाळ, जीवन शिर्के, कोरेगाव तालुका अध्यक्ष, सुधाकर शितोळे, अस्लम भाई, विक्रम मोहिते, संदीप कांळगे, दिलीप पिसाळ, गणपत कदम, संकेत सांळुखे, विजय झाझुंर्णे व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. राजू शेळके यांनी सांगितले की, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गाऱ्हाणं मांडत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चारशे रुपये मागितले आहेत. याही वर्षीचे साखरेचे दर चांगले आहेत. त्यामुळे मागण्या मान्य झाल्याशिवाय, आंदोलन मागे घेतले जाणार नाही.