खंडाळा : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत हा कारखाना भागीदारी तत्त्वावर चालवायला देण्याच्या विषयावरून खडाजंगी झाली. वार्षिक अहवालाच्या विषयावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले. सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला. विषय पत्रिकेवरील विषय आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. दरम्यान, कारखाना हा शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहील, चालवायला दिला तरी मालकी सभासदांचीच राहील, असा विश्वास किसनवीर कारखान्याचे चेअरमन आ. मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.
म्हावशी येथील कारखाना कार्यस्थळावर कारखान्याची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. चेअरमन विश्वनाथ पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उदय कबुले, संचालक नितीन भरगुडे-पाटील, दत्तानाना ढमाळ, चंद्रकांत ढमाळ, रमेश धायगुडे, शामराव गाढवे, सुनील शेळके उपस्थित होते. बापूराव धायगुडे यांनी कारखाना चालवण्याला देण्यास विरोध दर्शवला. सत्तारुढ गटाने नफातोटा पत्रक, ऑडिट तपासणी, ऑडिटर नेमणूक, शेअर्स येणेबाकी वसुली ऊस बिलातून करणे, कारखाना चालवण्यास देणे हे विषय आवाजी मतदानाने मंजूर केले.
आ. मकरंद पाटील म्हणाले की, कारखाना सुरू करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी ४० टक्के रक्कम आगाऊ देण्यात आली आहे होती. ऊस तोडणी टोळ्यांनी फसवणूक केल्याने हंगाम अडचणीत आला. यंदा साडेतीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप उद्दिष्ट आहे. कारखान्याची खाती एनपीएमध्ये गेल्याने कर्ज उभारणी करण्यास अडचणी आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे. चेअरमन व्ही. जी. पवार यांनी प्रास्तविक केले. व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. चंद्रकांत ढमाळ यांनी आभार मानले.