२१ जुलैपर्यंत थकीत एफआरपी न मिळाल्यास राजू शेट्टींचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रास्त आणि किफायतशीर किमतीची (एफआरपी) थकीत रक्कम २१ जुलैपर्यंत न मिळाल्यास आगामी गळीत हंगामात राज्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिला. दिलेल्या मुदतीत ‘एफआरपी’ न मिळाल्यास २१ जुलैला पुन्हा साखर आयुक्तालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत ‘एफआरपी’ द्यावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, गाईच्या दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान देऊन संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी आदी
मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘कैफियत मोर्चा’ काढला. अलका चौक ते साखर संकुल या मार्गे काढलेल्या या मोर्चाला साखर संकुलाजवळील कृषी भवनासमोर थोपवून पोलिसांनी साखर संकुलात जाण्यास मज्जाव केला. त्या वेळी शेतकऱ्यांनी ठिय्या मारून सरकार विरोधात घोषणाबाजी केली; तसेच आसूड ओढून मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
त्यानंतर कृषी भवनासमोर जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे, प्रवक्ते योगेश पांडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील आदी उपस्थित होते. या वेळी ‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे केलेले कायदे’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
शेट्टी म्हणाले, ‘साखर कारखान्यांचे हित लक्षात घेऊन आतापर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगला. सध्या साखरेचे दर चांगले असतानाही एफआरपी देण्यास कारखाने टाळाटाळ करीत आहेत. २१ जुलैपर्यंत संबंधित कारखान्यांनी थकीत एफआरपी न दिल्यास आगामी गळीत हंगाम होऊ देणार नाही. एफआरपी थकल्यास २१ जुलैला पुन्हा साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार आहे. ऊस दर नियंत्रण समितीने तोडणी वाहतुकीचे दर निश्चित केले आहेत. आता या समितीवर नवीन सदस्य आले आहेत. या समितीकडून तोडणी वाहतुकीच्या दरात बदल केला गेल्यास गळीत हंगाम होऊ देणार नाही. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अचडणीत आला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या धर्तीवर गायीच्या दुधासाठी प्रती लिटर पाच रुपये अनुदान देऊन ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.
आजपर्यंत अनेकांनी शक्तिप्रदर्शन आणि मोर्चे काढले असतील; पण ही बळीराजाची फौज आहे. प्रसंग आलाच तर शिंगावर घेणारी ही फौज आहे. आम्ही गुंडागर्दी करण्यासाठी आलो नाही. लोकांना वेठीसही धरणार नाही. अन्याय झाल्याने कैफियत घेऊन आलो आहोत. आमच्या नादाला लागू नका. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे.
राजू शेट्टी
देशमुखांच्या कारखान्यांकडे कोट्यवधी थकले
‘राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या तीन साखर कारखान्यांकडे सुमारे ६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. हा प्रकार म्हणजे दरोडेखोरांच्या हातात तिजोरी दिल्याप्रमाणे आहे,’ अशी टीका शेट्टी यांनी केली.