लखनौ : राज्य सरकारच्या कृषी मशीनरी बँकेच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ देण्यासाठी ७७ सहकारी आणि साखर कारखाना समित्यांसाठी ५० ते ५५ हॉर्स पॉवरयुक्त ट्रॅक्टर्स सज्ज करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ट्रॅक्टर्सना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. राज्यातील १५८ ऊस विकास तथा २८ साखर कारखाना सोसायट्यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेशात ६४ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. यापैकी ४६ लाख शेतकरी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करतात.
ऊस आणि साखर उद्योगाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, राज्यातील बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी लघू आणि मध्यम श्रेणीतील आहेत. त्यांच्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पुरेशा आर्थिक साधनांचा अभाव आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून त्यांना सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. ते म्हणाले की, कृषी मशीनरी बँक राज्यातील १४६ सहकारी आणि साखर कारखाना समित्यांकडून चालविली जाते. पिलिभीतमध्ये सहा कृषी मशीनरी बँक कार्यरत आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला तीन ट्रॅक्टर देण्यात आले आहेत. ते छोट्या आणि लघू शेतकऱ्यांना आपली शेती यांत्रिकीकरणाद्वारे करणे आणि बड्या शेतकऱ्यांसोबत स्पर्धा करण्यास उपयुक्त ठरतील.