नवी दिल्ली : देशातील कोळशावर आधारित वीजनिर्मितीमध्ये एप्रिल-डिसेंबर २०२३ या कालावधीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे १०.१३ टक्के वाढ दिसून आली आहे. याच कालावधीत एकूण वीजनिर्मिती ६.७१ टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल-डिसेंबर २०२३ या कालावधीत देशांतर्गत कोळशावर आधारित वीजनिर्मिती ८७२ अब्ज युनिट्स (BU) वर पोहोचली. जी मागील वर्षी याच कालावधीत उत्पादित ८१३.९ अब्ज युनिट्स (BU) वरून ७.१४ टक्के वाढ दर्शवते. वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पुरेसा कोळसा पुरवठा आहे.
विजेची मागणी वाढूनही एप्रिल-डिसेंबर २०२३ या कालावधीत मिश्रित करण्यासाठी कोळशाची आयात ४०.६६ टक्क्यांनी घटून १७.०८ मेट्रिक टन इतकी झाली आहे. हे कोळसा उत्पादनात स्वावलंबन आणि एकूणच कोळसा आयात कमी करण्यासाठी देशाची वचनबद्धता दर्शवते. भारतात पारंपारिक (औष्णिक, आण्विक आणि जलविद्युत) आणि अक्षय स्रोत (पवन, सौर, बायोमास इ.) पासून वीज निर्माण केली जाते. तथापि, वीज निर्मितीचा प्रमुख स्त्रोत कोळसा आहे, जो एकूण वीज निर्मितीच्या ७० टक्क्यांहून अधिक आहे.
भारतातील कोळशावर आधारित वीजनिर्मितीने देशाच्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. औद्योगिक वाढ, तांत्रिक प्रगती, लोकसंख्या वाढ, आर्थिक वाढ इत्यादी घटकांच्या संयोजनामुळे भारत सध्या विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ अनुभवत आहे. सरकार कोळशाचे उत्पादन आणखी वाढवण्यासाठी त्याची उपलब्धता वाढवणे आणि आयात कोळशावरील अवलंबित्व कमी करणे, याद्वारे परकीय चलन साठा सुरक्षित करणे या उद्देशाने प्रयत्न करत आहे.