कोल्हापूर, ता. 31 : जिल्ह्यात ऊस तोड मजूर, वाहतूकदार किंवा इतर बाहेरचे कर्मचारी असतील तर त्यांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था ज्या-त्या साखर कारखान्यांने करायची आहे. सध्या हे लोक आपल्या गावाकडे जाण्यासाठी गर्दीने बाहेर पडत आहे. त्यामुळे हे कामगार कोणत्या कारखान्यात काम करतात हे विचारून त्या कारखान्यांवरच गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला. त्यामुळे साखर कारखान्यातील कामगार, ऊस तोड मजूरांसह इतरांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, जिल्ह्यासह राज्यात संचारबंदी आहे. सध्या साखर कारखान्यांकडे सर्वाधिक ऊस तोड मजूर किंवा कामगार आहेत. त्यांच्या रहाण्याची व खाण्याची व्यवस्था करायची आहे. कारखाने संपले म्हणून अनेक कारखान्यांचे कामगार रस्त्यावर गर्दीकरून आपआपल्या गावी जाताना दिसत आहेत. जिल्ह्यातील अशा कामगारांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. काही दिवसांसाठी या सर्व कामगार व ऊस तोड मजूरांची काळजी कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात तीन साखर कारखाने सुरू आहेत. जे कारखाने कामगारांची काळजी घेणार नाही, अशा साखर कारखाने व उद्योजकांवर कडक कारवाई केली जाईल. इचलकरंजी,कागल फाईव्हस्टार एमआयडीसीमध्ये बाहेरील कामगार आहे. या उद्योगातील कारखानदारांनीही आपल्या कामगारांची काळजी घ्यायची असल्याचेही श्री देसाई यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.