शामली : एकीकडे साखर कारखाने आगामी गळीत हंगाम २०२२-२३ची तयारी करीत आहेत, दुसरीकडे शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील पैसे मिळालेले नाहीत. अद्यापही शामली, ऊन आणि थानाभवन या तिन्ही कारखान्यांकडे ४७६.१८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत, गळीत हंगामापूर्वी शेतकऱ्यांना १०० टक्के ऊस बिले देण्याचे निर्देश दिले आहेत. जर बिले दिली नाहीत, तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस वितरणात कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून जिल्हाधिकारी जसजित कौर यांनी ऊस बिलांच्या थकबाकीविषयी चर्चा केली. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर यांनी सांगितले की, शामली कारखान्याकडे १९४.५२ कोटी रुपये, ऊन कारखान्याकडे १०७.७७ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याकडे १७३.८९ कोटी रुपये अशी एकूण ४७६.१८ कोटींची थकबाकी आहे. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी बिले द्यावीत अन्यथा कारखान्याचा ऊस कपात केला जाईल असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. १५ ऑक्टोबरपर्यंत देखभाल, दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष कुमार सिंह, शामली कारखान्याचे प्रदीप कुमार, सुशील कुमार, ऊन कारखान्याचे विजित कुमार, अवनीश कुमार, थानाभवन कारखान्याचे कुलदीप पिलायानिया, जीवी सिंह आदी उपस्थित होते.