सोलापूर : जय श्रीराम शुगरला आलेल्या आर्थिक अडचणींमुळे पुढे कारखाना चालविणे शक्य नव्हते. अशा वेळेस आमदार रोहित पवार यांच्या सहकार्यामुळे कारखान्याला नवसंजीवनी मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत, असे प्रतिपादन कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट के. एन. निबे यांनी केले. जय श्रीराम शुगरच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेहमेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी किसनराव ढवळे, सुधीर गाढवे, श्रीहरी साखरे, सोमनाथ शिंदे, नवनाथ चौधरी, जितेंद्र चांदगुडे, प्रदीप दंडे, मदन लेकुरवाळे, किरण रोडे व आजी-माजी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निबे म्हणाले की, कारखाना चालवित असताना कारखान्याचे चेअरमन एम. एन. नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कायम शेतकरी हिताचा विचार केला गेला. कठीण परिस्थितीमध्ये कारखाना चालविताना खूप अडचणींवर मात करून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अगदी मनापासून काम केले. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे चेअरमन प्रा. एम. एन. नवले यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. गेल्या गळीत हंगामात जय श्रीराम शुगर कारखान्याने तीन लाख ५१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून इतिहास निर्माण केला. शेतकऱ्यांना दोन हजार ९०० रुपये प्रति टन प्रमाणे दर दिला आहे. आगामी हंगामही आमदार रोहित पवार, प्रा. एम. एन. नवले, सुभाष गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडू, असे के. एन. निबे यांनी सांगितले. जनरल मॅनेजर विलास निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शेतकी अधिकारी मधुकर मोहिते यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अनंत जायभाय यांनी केले.