सोलापूर : सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह १९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित दोन जागांवरील उमेदवारांनी माघार घेतल्यास या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊ शकणार आहे. कारखान्याचे हित लक्षात घेता विरोधी गटाचे उमेदवार मधुकर पाटील यांनी मोहिते-पाटील यांच्या विरोधात दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता विरोधी गटातर्फे गोपाळ गोरे व उत्तम बाबर यांचेच उमेदवारी अर्ज बाकी राहिले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आज, १४ फेब्रुवारीपर्यंत आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. २१ संचालक निवडीसाठी एकून ४० उमेदवारांचे ४२ अर्ज दाखल झाले होते. १२ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले होते. यापैकी काही विरोधी उमेदवारांनी या निकालाविरुध्द जिल्हा सहकार निवडणुक निर्णय अधिकारी साठे यांच्याकडे अपिल केले होते. परंतु दि १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी फेटाळल्याने आता २१ जागांसाठी केवळ २३ अर्ज राहिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी अर्जाची छाननी केली.