बरेली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी त्वरीत देण्यात यावी. त्यास उशीर करणाऱ्या कारखान्यांच्या व्यवस्थापनाविरोधात कारवाई केली जाईल, असे आदेश आयुक्त सेल्वा कुमारी यांनी दिले. सोमवारी आयुक्तांनी ऊस थकबाकीबाबत कारखान्यांच्या व्यवस्थापकांसोबत बैठक घेत विभागीय स्तरावर आढावा घेतला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आयुक्तांनी सांगितले की, बहेडी साखर कारखान्याकडे १२५.७५ कोटी रुपये थकीत आहेत. नबावगंज साखर कारखान्याकडे ५३.१४ कोटी रुपये, बरखेडा कारखान्याकडे १५९.५२ कोटी रुपये आणि मकसूदपूर कारखान्याकडे ८९.१४ कोटी तसेच बिसौली कारखान्याकडे ४४.८१ कोटी रुपये थकीत आहेत.
कारखाना प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून तातडीने शेतकऱ्यांना पैसे द्यावेत. आयुक्तांनी आगामी गळीत हंगामासाठी कारखान्यातील देखभाल-दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, कारखान्यांच्या वजन काट्यांची पडताळणी, ऊस वाहतूक व्यवस्था आदींचा आढावा घेतला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्सचा विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांकडून फिटनेस तपासावा याबाबत सूचना केली. बैठकीला ऊस उपायुक्त, जिल्हा ऊस अधिकारी, सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.