पंजाबमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध: मुख्यमंत्री मान

चंदीगढ : राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या पिकाची वेळेवर खरेदी आणि त्याचे पैसे देण्यात येतील असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. मुख्यमंत्री मान यांनी ऊस नियंत्रण बोर्डाच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले की, राज्य सरकारने उसाचा दर ३६० रुपये प्रती क्विंटलवरून ३८० रुपये प्रती क्विंटल केला आहे. मान यांनी बैठकीस उपस्थित खासगी कारखान्यांच्या मालकांना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे पूर्ण पैसे द्यावेत असे निर्देश दिले.

मुख्यमंत्री मान यांनी कारखानदारांना सांगितले की, वेळेवर ऊस खरेदी सुरू झाली पाहिजे. तसेच पैसेही ठराविक मुदतीत देण्याची गरज आहे. ते म्हणाले, या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही. राज्यात पिक वैविध्यिकरण योजनेअंतर्गत शेतकरी ऊस उत्पादन करू इच्छितात. मात्र, पुरेसा दर मिळत नसल्याने आणि वेळेत पैसे मिळत नसल्याने ते धाडस करीत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री मान यांनी सांगितले की, राज्य सरकारने ऊस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, राज्य सरकार फगवाडा कारखान्याच्या थकीत बिलांबाबतही लवकरच योग्य तोडगा काढणार आहे. शेतकऱ्यांकडून फगवाडा कारखान्याच्या आसपासचा ऊस खरेदीसाठी योग्य पावले उचलली जातील. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेऊ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here