पेट्रोल, डिझेलसह अन्य पेट्रोलियम पदार्थ आणि भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यातील सर्वसाधारण महागाई निर्देशांक 4.43 टक्के इतका नोंदविला गेला आहे. पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ अशीच चालू राहिली, तर येत्या काही काळात हा निर्देशांक पाच टक्क्यांच्या वर जाण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
एप्रिल महिन्यात महागाई निर्देशांक 3.18 टक्के इतका होता, तर गतवर्षीच्या मे महिन्यात हा निर्देशांक 2.26 टक्के इतका होता. भाजीपाल्याच्या दरात 2.51 टक्क्याने वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल महिन्यात इंधन श्रेणीचा निर्देशांक 7.85 टक्क्यांवर गेला होता. मेमध्ये तो झपाट्याने वाढून 11.22 टक्क्यांवर गेला आहे.वार्षिक तत्त्वावर बटाट्याचे दर 81.93 टक्क्याने वाढले असून, फळांचे दर 15.40 टक्क्यांनी वाढले आहेत.
डाळींच्या दरात मात्र वार्षिक तत्त्वावर 21.13 टक्क्याने घट झाली आहे. मार्च महिन्यातील सर्वसाधारण महागाई दराचे सुधारित आकडे आले असून, हा दर 2.47 टक्क्यांऐवजी 2.74 टक्के इतका नोंदविला गेला आहे. महागाई दरातील वाढ लक्षात घेऊन अलीकडेच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केली होती.