मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने तसेच गारपीटीमुले शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महसूल आणि कृषी विभागाने तातडीने एकत्र सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जावून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. प्रशासनाला पंचनामे युद्धपातळीवर करण्याबाबत पुढाकार घेण्याच्या सूचना केल्या. अवकाळी पाऊस आणि गारपीटसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने सादरीकरण केले. पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत अशी सूचना करण्यात आली. याचबरोबर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्यांना भरपाई त्वरीत मिळावी यासाठी प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यास तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग-१ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबत मान्यत देण्यात आली. या निर्णयामुळे ६ जिल्ह्यांतील १० तालुक्यांमध्ये ३८ हजार ३६१ एकर क्षेत्रावरील सुमारे २६०० खंडकरी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमिनी खंडकरी शेतकरी व त्यांच्य वारसांना भोगवटादार वर्ग-२ य धारणाधिकाराने वाटप करण्यात आलेल्या होत्या. या जमिनींचा धारण प्रकार वर्ग-१ करून मिळणेबाबत खंडकरी शेतकऱ्यांची दीर्घ मागणी आता मंजूर झाली आहे.