सातारा : पश्चिम महाराष्ट्राला प्रलयकारी महापुराचा फटका बसला. यात ऊस शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांपुढे ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापुरात अनेक ठिकाणचे ऊस पिक वाया गेले आहे. त्यामुळे गाळप हंगामात तोड कशाची करायची, असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या तोडणी मजुरांचे व्यवहार सध्या थांबल्याचे दिसत आहे. तोडणी मंजुरांमध्ये चिंता वाढली आहे. दरवर्षी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातून मोठ्याप्रमाणावर तोडणी मजूर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली तसेच उत्तर कर्नाटकमध्ये जात असता. त्यासाठी या मजुरांना श्रावण महिन्यात ऍडव्हान्स देऊन त्यांना बुक करून घेतले जाते. परंतु, यंदा मुकादमांकडून मजुरांना ऍडव्हान्स मिळालेला नाही.
माण तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळेच तेथील कुटुंबे रोजगाराच्या शोधात असतात. ऊस गाळप हंगाम त्यांच्यासाठी संधी असते. पण, यंदाच्या महापुरामुळे त्यांच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अनेक साखर कारखान्यांच्या क्षेत्रात ऊसच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मजुरांकडून तोडणी कशाची करायची, असा प्रश्न कारखान्यांपुढे आहे. त्यातच महापुराच्या आधी अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त छावण्यांना दिला आहे. त्यामुळे उसाची उपब्धताच कमी असणार आहे.
दिवाळीच्या सुमारास कोल्हापूर, सांगली पट्ट्यात कारखान्यांची धुराडी पेटतात. श्रावण महिन्यात उचल मिळाल्यास या कामगारांचा उदनिर्वाह चालतो. पण, यंदा अजून उचलच मिळालेली नसल्यामुळे मजुरांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. एका ऊस तोडणी मुकादमाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा एका टोळीला सात ते साडे सात लाख रुपये मिळतील. अनेकांकडे गेल्या हंगामाची फेरबाकी असल्यामुळे व्यवहार कसा करायचा, असा प्रश्न आमच्यापुढे आहे. तर, मजुरांवर फेरबाकीच्या कर्जाचे ओझे असल्यामुळे मजुरांमध्येही चिंता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.