नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना महामारी झेलत असलेल्या भारताला लस उपलब्ध झाल्यानंतर दिलासा मिळत असल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाचे नवे १३ हजार १८३ रुग्ण आढळले आहेत. तर १० हजार ८९६ जण बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे ९७ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या एकूण संख्येचा विचार केला तर आतापर्यंत १,०९,६३,३९४ लोकांना संक्रमणाचा फटका बसला आहे. त्यापैकी १,०६,६७,७४१ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ५६ हजार १११ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाचे १ लाख ३९ हजार ५४२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. देशभरात आजअखेर १ कोटी १ लाख ८८ हजार ७ लोकांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले आहे.
एकीकडे देश आणि जगाची स्थिती सुधारली असली तरी महाराष्ट्रात स्थिती बिघडत चालली आहे. महाराष्ट्रात ६ ते १२ फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचे नवे २० हजार ५९० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २० हजार २०० जणांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली आहे. तर १६९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोवीड १९च्या रुग्णांच्या संख्येत साप्ताहिक सरासरी २९४१ होती. तर बुधवारपासून दररोजच्या रुग्णांत गतीने वाढ झाली. एकूण रुग्णसंख्या २.१ मिलीयनच्या आसपास आहे. तर रुग्ण बरे होण्याची संख्या १९ लाख ७२ हजार ४७५ आहे. लॉकडाउन पूर्णपणे बंद झाल्यानंतर कोरोनाचा पुन्हा परिणाम दिसू लागला आहे. याशिवाय राज्यातील शाळाही हळूहळू सुरू झाल्या आहेत.