कोल्हापूर : राज्यात ऊस तोडणी हंगामास बुधवारपासून (1 नोव्हेंबर) सुरु झाला आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरु होण्याअगोदरच संघर्षाची पेरणी झाली आहे. गेल्या हंगामातील दर फरक आणि यंदाच्या ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश, शेतकरी संघटना, शेकाप यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कारखानदार धास्तावले आहेत. बहुतांश संघटनांचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात असल्याने येथील हंगामावर याचा परिणाम होणार आहे. राज्याच्या उर्वरीत भागात नियमित हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. कमी उसाच्या उपलब्धतेमुळे जेमतेम १०० दिवस हंगाम चालेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वीच कोल्हापूरसह राज्यातील काही कारखान्यांनी एफआरपी जाहीर करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गेल्या हंगामातील दर फरकाबाबत साखर कारखान्यांनी काहीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांमध्ये संतप्त भावना आहे. अनेक कारखान्यांनी आजपासून हंगाम सुरू करण्यासाठी ऊस तोडणीसाठी तयारी ठेवली आहे. तोडणी मजुरांना ऊस तोडणीचा कार्यक्रमही दिला आहे. काही कारखान्यांनी पोलिस बंदोबस्तात ऊस तोडणी करण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, जिथे ऊस तोडी सुरू होतील तिथे आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर संघटनांनी मागील हंगामातील उसास ४०० रुपये प्रती टन मिळावेत आणि नवा दर जादा असावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ऊस तोडी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हंगाम आजपासून सुरू होत आहे.