नवी दिल्ली : कोरोनाचा फटका बसलेल्या उद्योग जगताला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सरकारकडून पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे. उद्योग जगताने परिस्थितीचा आढावा घेऊन वेट अँड वॉचची स्थिती ठेवावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.
कोरोना महामारी रोखण्यासाठीच्या सरकारच्या उपायांकडे आपण सकारात्मक पाहिले पाहिजे. उद्योगजगताने परिस्थितीवर नजर ठेवावी. महामारीविरोधात उद्योग जगत आणि सरकार एकत्र आहे असे अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या.
फिक्की या उद्योजकांच्या संघटनेशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सीतारमण म्हणाल्या तिमाहीच्या मूल्यांकनाआधी काही दिवस सावधानतेने परिस्थिती पहावी. कोरोनाच्या सुरुवातीपासून हॉस्पिटॅलिटी, विमानसेवा, पर्यटन, हॉटेल्स हे व्यवसाय अडचणीत आले आहेत. सरकारने इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीममध्ये त्यांचा समावेश केला आहे.
वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रासाठीही ऑक्सिजन पुरवठा सुरू केला जाईल. यापूर्वीच अर्थमंत्र्यांनी देशव्यापी लॉकडाउन लावणार नसल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे उद्योग जगतानेही कोरोनाच्या काळात साथ देण्याचे आश्वासन दिले. सरकारने एमएसएमईकडे खास लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, सरकार लवकरच ई कॉमर्स कंपन्यांकडून होणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्याविषयी निर्णय घेईल. फिक्कीसमवेत झालेल्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी मंत्रिगटासमोर हा प्रश्न मांडू. सर्वत्र नियम सारखे असतील असे आश्वासन दिले.