नवी दिल्ली : बड्या शीतपेय उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्र, गुजरातेतून साखर खरेदी करू नये यासाठी दबाव आणण्यासाठी साखर उद्योगाविरुद्ध षड्यंत्र रचले गेले आहे. त्यासाठीच महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या कथित शोषणाबद्दलची खोडसाळ माहिती देऊन अमेरिकेतील प्रसार माध्यमांनी बदनामी सुरू केली आहे, असा आरोप राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केला आहे. महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शोषणाचे आरोप फेटाळले.
महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील एकूण साखर उत्पादनापैकी ६५ टक्के साखर या शीतपेय उत्पादक कंपन्यांकडून तसेच मिठाई बनविणाऱ्या कंपन्यांकडून खरेदी केली जात असते. मात्र, काही संस्थांनी ऊसतोड कामगारांच्या स्थितीबद्दलचे चुकीचे अहवाल तयार केले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयातर्फे त्याची दखल घेण्यात आल्यानंतर त्याआधारे महाराष्ट्रातील साखर खरेदी करू नये यासाठी मोठ्या शीतपेय कंपन्यांवर दबाव आणण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याचा परिणाम महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमधील साखर उद्योगावर होऊ शकतो. हा संपूर्ण प्रकार म्हणजे साखर उद्योगाविरुद्धचे षड्यंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला.