अहमदनगर : पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर राज्यात आणि परराज्यात मुलाबाळांसह ऊस तोडला. त्याच ऊसतोडणी कामगारांच्या मालकीचा साखर कारखाना असावा, असे स्वप्न स्व. बबनराव ढाकणे यांनी पाहिले. केदारेश्वर साखर कारखान्याची निमिर्ती करून त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरविले. ऊसतोड कामगारांच्या मालकीचा केदारेश्वर राज्यातला एकमेक साखर कारखाना आहे. कारखान्याच्या उभारणीसाठी कष्ट त्यांना घ्यावे लागले. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करण्याचे जोखमीचे काम त्यांनी केले, असे गौरवोद्गार कृषितज्ज्ञ राजेंद्र पवार यांनी काढले.
राजेंद्र पवार यांनी शेवगाव तालुक्यातील खामपिंप्री येथे संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे अधिकारी व शेतकी विभागातील कर्मचाऱ्यांना साखर उद्योगातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ॲड प्रताप ढाकणे यांच्या कामांबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी राजेंद्र पवार यांचा सत्कार केला. कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, ज्ञानेश्वर दसपुते, संचालक विठ्ठलराव दसपुते, सेवा संस्थेचे अध्यक्ष बप्पासाहेब पावसे, खामपिंप्रीचे सरपंच रंगनाथ मोडके उपस्थित होते.