ग्राहक सक्षमीकरण हे विकसित भारताचे मुख्य वैशिष्ठ्य असेल, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री पीयूष गोयल यांनी आज केले. सर्व व्यवहारांच्या केंद्रस्थानी ग्राहकाला ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. ते नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक दिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. ग्राहक व्यवहार विभागाने विविध मार्गाने पुढाकार घेत वेगवेगळ्या योजना राबवल्याबद्दल आणि त्यांतील उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी विभागाचे कौतुक केले.
ग्राहक व्यवहारासंबंधित दावे वेगाने निकालात काढण्यासाठी लक्षणीय प्रयत्न घेतल्याबद्दल देशभरच्या ग्राहक आयोगांचे त्यांनी कौतुक केले. ‘ग्राहक आयोगांमध्ये दाव्यांचा प्रभावी निपटारा’ या आजच्या संकल्पनेचा उल्लेख करत ते म्हणाले की ही संकल्पना सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करते. तक्रारदार ग्राहकांना जलद न्याय देण्याच्या हमीसोबतच व्यापक स्तरावर देशाला वेळेवर न्याय देण्याची हमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार व्यावसायिक तसेच ग्राहकांसाठीही गोष्टी अधिक सोप्या करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. ग्राहक व्यवहार विभागाचे प्रयत्न हे एककेंद्राभिमुखता , क्षमता बांधणी आणि हवामान बदल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या तीन महत्त्वाच्या संकल्पनांचाच प्रतिध्वनी आहे असे गोयल यांनी अधोरेखित केले.
एककेंद्राभिमुखतेमुळे नियम पालनासाठी उद्योग आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यावर लादलेले नियमांचे ओझे कमी होईल असे गोयल यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात पंधराशे अनावश्यक कायदे मोडीत काढले आहेत. जवळपास 39,000 नियम सुलभ केले आहेत तसेच किरकोळ चुका गुन्ह्यातून वगळण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
जनविश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक -2022 असे एक सर्वसमावेशक विधेयक सरकारने गुरुवारी मांडले. व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभता साधण्यासाठी किरकोळ चुका गुन्हे धरले जाऊ नयेत यासाठी हे विधयेक आहे. या विधेयकाद्वारे 19 मंत्रालयाशी संबंधित वेगवेगळ्या कायद्यांमधल्या सुमारे शंभरहून अधिक तरतुदी फौजदारीतून वगळल्या जातील
राष्ट्रीय हेल्पलाइन पूर्वी फक्त दोन भाषांमध्ये होती त्यामध्ये आता इतर भाषा समाविष्ट केल्या गेल्या आहेत त्यामुळे आता ही सेवा बारा भाषांमध्ये उपलब्ध आहे जेणेकरून ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर मातृभाषेत या हेल्पलाइनवर संभाषण साधता येईल, असे गोयल यांनी नमूद केले.
टेक्नॉलॉजी ट्रेनिंग आणि ट्रान्सपरन्सी अशा तीन टी वर म्हणजेच तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि पारदर्शकता यावर त्यांनी भर दिला. हे तीन टी आपल्याला मोठ्या प्रमाणावर ग्राहक जागरुकतेसाठी मदत करतील आणि आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा बहाल करता येईल असे ते म्हणाले.
उत्पादनाचा उत्तम दर्जा आणि योग्य किंमत यासाठी ग्राहकांनी अधिक आग्रही राहिले पाहिजे असे आवाहन गोयल यांनी ग्राहकांना केले. आपल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्नाने आपण देशातील प्रत्येक भारतीयाचे जीवन वेगळ्या पातळीवर नेऊ शकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
(Source: PIB)