लखनौ : चीनी मंडी
उत्तर प्रदेशातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये आता सल्फरलेस साखर तयार होणार आहे. याची सुरुवात तीन साखर कारखान्यांनी केली असून, त्यात ननौता, बेलरायां आणि सम्पूर्णानगर यांचा समावेश आहे. यासह १८ सहकारी साखर कारखान्यांमध्ये साखरेच्या रंगाची किंमत पडताळण्यासाठी सुक्रोस्केन तंत्रज्ञानाचा वाप केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे दुप्पट शुद्ध साखर तयार होणार आहे. त्यासाठी लागणारी ई-टेंडरची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मुळात उत्तर प्रदेश सरकारने साखरेची गुणवत्ता आणि सहकारी साखर कारखान्यांच्या आधुनिकीकरणासाठी १०० कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता दिली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्याची अपेक्षा आहे.
उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण आणि साखरेच्या गुणवत्ता सुधारणेसाठी एक महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला ऊस विकास विभागाचे मुख्य सचिव संजय आर. बोसरेड्डी तसेच साखर कारखाना संघाचे विमल कुमार दुबे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सरकारने जाहीर केलेल्या १०० कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपये साखर कारखाने संघाला मिळाले आहेत. यातून १८ कारखान्यांमध्ये नवे तंत्रज्ञान लागू करण्यात येईल, त्यातून डबल रिफाइंड साखर तयार होणार आहे, अशी माहिती विमल कुमार दुबे यांनी दिली.
दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिपराइच साखर कारखान्यात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार होणार आहे. उत्तर प्रदेशात सध्या ४५ साखर कारखाने कार्यान्वित झाले आहेत. यात सहा सहकारी आणि ३९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यात ९१.५७ लाख क्विंटन उसाचे गाळप झाले असून, ८.८७ टक्के रिकव्हरीतून ८.१२ लाख साखर उत्पादन झाले आहे, असे दुबे यांनी सांगितले. कारखान्यांच्या आधुनिकीकरणासाठी दिलेले पैसे दिलेल्या मुदतीत योग्य पद्धतीने खर्च करण्याच्या सूचना बैठकीत मंत्री राणा यांनी दिल्या.
सल्फरलेस साखरेचे फायदे
मुळात बाजारात तीन प्रकाराच्या साखरेची विक्री होते. एक पांढरी, दुसरी ब्राऊन आणि तिसरी सल्फरलेस. साखर ही ब्राऊनच तयार होत असते. त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आयर्नचाही समावेश असतो. त्या साखरेला पांढरी करण्यासाठी सल्फरचे मिश्रण केले जाते. पण, त्यामुळे त्यातील जीवनसत्वांची मात्रा कमी होऊन जाते. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यात कैरोरी ची मात्रा अधिक असल्यामुळे श्वसनाचे त्रास होण्याचा धोका असतो.
सामान्यांना खरेदी शक्य
सल्फरशिवाय रिफाइंड केलेली साखर आरोग्यासाठी चांगली असते. सध्या केवळ काही मोजक्या साखर कारखान्यांमध्येच अशा प्रकारची साखर तयार केली जाते. अर्थात त्याची विक्रीही जादा किमतीला होत आहे. आता सहकारी साखर कारखान्यांत अशी साखर तयार झाली, तर ती सामान्य ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.