अहिल्यानगर : राज्यात पंचवीस वर्षांपूर्वी १२८ सहकारी आणि नऊ व ९ खासगी साखर कारखाने होते. या अडीच दशकांत खासगी कारखान्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत, तेवढीच खासगी कारखान्यांची संख्या झाली आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना काळानुरूप बदल करावे लागणार आहेत, असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाची सांगता ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या झआली. यावेळी आमदार काळे बोलत होते.
आमदार काळे यांनी सांगितले की, कारखान्याने १२१ दिवसांच्या गळीत हंगामात ६,५८,५०० मे. टन उसाचे गाळप करून ७,३४,४५० क्विंटल साखर पोती उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.१९ टक्के आहे. पुढील प्रोसेसिंग सुरु असल्याने अंतिम साखर उतारा नंतरच कळेल. खरेतर किमान १६० दिवसांचा गाळप हंगाम होणे अपेक्षित आहे. पण कमी दिवसाच्या हंगामामुळे कारखान्यांची कोंडी होते. त्यामुळे कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उपलब्ध होण्याची गरज आहे. यावेळी संचालक अॅड. राहुल रोहमारे व त्यांच्या पत्नी सोनालीताई रोहमारे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. माजी संचालक पद्माकांत कुदळे, एम. टी. रोहमारे, नारायणराव मांजरे, ज्ञानदेव मांजरे, सिकंदर चांद पटेल, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव चव्हाण आदी उपस्थित होते.