नवी दिल्ली : भारतात कोरोना महामारीच्या फैलावामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. जे लोक फारसे आर्थिक समृद्ध नाहीत, अशा लोकांमध्ये ही स्थिती अधिक दिसून येते. पुढील सहा महिन्यात आपले उत्पन्न अधिक घटेल अशी भीती अनेकांना वाटत असल्याचे अलीकडच्या एका सर्व्हेतून उघड झाले आहे.
या सर्व्हेनुसार, तब्बल ५८ टक्के लोकांनी आपली कमाई पुढील सहा महिन्यात घटेल अशी शक्यता व्यक्त केली. जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (बीसीजी) हा सर्व्हे २३ ते २८ मे या कालावधीत केला आहे. यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीतील शहरी तसेच ग्रामीण भारतातील ४००० ग्राहकांचा समावेश आहे.
अभ्यासात असे दिसून आले आहे की, ५१ टक्के ग्राहकांना असे वाटते की पुढील सहा महिने त्यांचा खर्च कमी स्तरावर राहील. यापूर्वी २० जुलै ते २ ऑगस्ट २०२० या कालावधीतील सर्व्हेत लोकांनी कोरोना व्हायरस हा त्यांच्या नोकरी, व्यवसायासाठी मोठा धोका असल्याचे म्हटले होते. तर ८६ टक्के नागरिकांनी कोरोनामुळे मंदी येण्याची शक्यता व्यक्त केली होती.
निम्न स्तरावरील अनेक लोकांना आर्थिक स्थितीबाबत भीती वाटत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. शहरी आणि समृद्ध लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीवर कोरोनाचा अधिक प्रभाव दिसून येत आहे. बीसीजी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तथा भागिदार निमीषा जैन यांनी सांगितले की, निश्चितपणे लोकांमध्ये अनिश्चिततेची स्थिती आहे. विविध स्तरावरील खर्चाबाबत लोकांमध्ये फारसा फरक न पडल्याचे दिसून आले. आवश्यक खर्च, आरोग्य, घरातील मनोरंजन या बाबींवर लोकांचा खर्च सुरूच राहील. काही खर्चाला नागरिक मुरड घालतील असे जैन यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link