नवी दिल्ली : देशामध्ये जगभरातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत कोरोना संक्रमण झालेले १३ हजार ७८८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर कोरोनामुळे १४५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात या जागतिक महामारीच्या नव्या आणि सक्रिय रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोना संक्रमणाचे नवे १३ हजार ७८८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ५ लाख ७१ हजार ७७३ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे १४५ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात एकूण १ लाख ५२ हजार ४१९ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत १४ हजार ४५७ रुग्ण बरे झाले आहेत. यासोबतच एकूण १ कोटी २ लाख ११ हजार ३४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.