ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात ३७०० जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ३,१७,६०० पर्यंत पोहोचली आहे.
ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचे विक्राळ रुप पहायला मिळत आहे. दररोज वाढती मृतांची संख्या पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसमुळे ३७८० जणांचा मृत्यू झाला. एका दिवसात झालेल्या मोठ्या मृत्यूच्या आकडेवारीमुळे लोक हवालदिल झाले आहेत. देशात कोरोनाचे ८४,४९४ रुग्ण सापडले आहेत. तर एकूण संक्रमित व्यक्तींची संख्या १२.६५ मिलियनवर पोहोचली आहे. ब्राझीलची लोकसंख्या २१३ मिलियन इतकी आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक फटका ब्राझीलला बसला आहे. त्यामुळे ब्राझील सरकारने कोव्हॅक्सिनचे २० मिलियन डोस खरेदी करण्यासाठी गेल्या महिन्यात भारतासोबत करार केला आहे. मात्र, हे उपाय पुरेसे नसल्याचे ब्राझील सरकारच्या आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
देशात दररोज वाढत चाललेल्या मृत्यूंमुळे लोकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवड्यात येथे दररोज २६०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. तर ७५००० हून अधिक लोक संक्रमित होत होते. आता मंगळवारी ३७०० जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ३,१७,६०० वर पोहोचली आहे.
भारत बायोटेकसोबत ब्राझीलचा करार
कोरोनामुळे झालेल्या जगातील एकूण मृतांच्या संख्येपैकी एक चतुर्थांश मृत्यू ब्राझीलमध्ये झाले आहेत. आतापर्यंत यावर प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. कोरोनाविरोधात लढणाईत गंभीर नसल्याबद्दल राष्ट्रपती जायर बोलसोनारो यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे. तर भारत बायोटेकने ८ मार्च रोजी ब्राझीलमध्ये लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज केला होता. भारत आणि त्यांचे ब्राझीलमधील सहकारी प्रिसिसा मेडिकामेंटो यांनी सांगितले की, लसीसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केली जात आहे. भारतासह पाच देशांतील लस उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.