नवी दिल्ली : रेटिंग फर्म एस अँड पी ग्लोबलने चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा दर ११ टक्क्यांवरून घटवून ९.८ टक्के केला आहे. कोविड १९च्या दुसऱ्या लाटेने भारताची अर्थव्यवस्था सुधारणेच्या मार्गावरून घसरू शकते असा इशारा रेटिंग एजन्सीने दिला आहे.
मार्च महिन्यात या अमेरिकन एजन्सीने अंदाज व्यक्त केला होता. भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात ११ टक्क्यांची वाढ मिळेल असे अनुमान दर्शविले होते. एसअँडपीने भारताला बीबीबी- रेटिंग जारी करत स्थिर स्थिती असल्याचे सांगितले होते. आता असे सांगण्यात आले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेत जर खूप घसरण झाली तर याचा परिणाम सॉवरेन क्रेडिट प्रोफाईलवर पडेल. सद्यस्थितीत आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारत सरकारची तूट जीडीपीच्या १४ टक्के खाली घसरला आहे. आणि सरकारचे एकूण कर्ज जीडीपीच्या ९० टक्के झाले आहे.
बार्कलेजकडूनही दरात कपात
यापूर्वी जागतिक ब्रोकरेज फर्म बार्कलेजने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज घटवला होता. कोरोना लसीकरणाची संथ गती आणि कोरोना लसीच्या संक्रमणाचा वाढता दर आणि मृत्यूसंख्येतील वाढ यामुळे बार्कलेजने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारतातील जीडीपी वाढीचा अंदाज ११ टक्क्यावरून घटवून १० टक्के केला.
भारताच्या वाढीच्या दरावर परिणाम
गेल्या आठवड्यात स्टँडर्ड अँड पुअरने भारताला इशारा दिला होता. जर कोरोना वाढला तर आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होऊ शकेल. त्याचा थेट परिणाम भारताच्या वाढीवर होईल. ज्या पद्धतीने सुधारणेसाठी मोदी सरकार प्रयत्न करीत आहे, त्या पद्धतीने सध्या उच्च आर्थिक वाढ अपेक्षित आहे. स्टँडर्ड अँड पुअरने भारतावरील वाढत्या कर्जाबाबतही चिंता व्यक्त केली आहे.