कोल्हापूर: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दर प्रती पौंड १५ सेंटवरुन १२ ते १२.५ सेंटपर्यत खाली आले आहेत. कोरोनामुळे निर्यातीसाठी जहाजांची उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याने तुर्तास निर्यातच ठप्प होईल, अशी भीती साखर कारखानदारांमध्ये पसरली आहे.
जगभरातील साखरेचे उत्पादन यंदा तुलनेने घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर प्रति किलो १५ सेंटपर्यंत वधारले होते. गेल्या दोन वर्षातील हा उच्चांक होता. भारतात अतिरिक्त साखर शिल्लक असल्याने निर्यातीला मोठी संधी आहे. केंद्र सरकारनेही ६० लाख टन निर्यातीचे लक्ष्य देतांना निर्यात सवलतीही देऊ केल्या आहेत.
याबाबत बोलताना साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, ही साथ कमी झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजार सुधारणार नाही. निर्यातीसाठी जहाजेही मिळणार नाहीत. यंदा ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण आहे.
आतापर्यंत सुमारे ३८ लाख टन साखर निर्यातीचे करार झालेले आहेत. तर सुमारे २३ लाख टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. चांगला दर मिळत असल्याने साखर कारखानदारातही उत्साहात होते . या हंगामात लक्ष्याच्या जवळपास म्हणजेच ५० ते ५५ लाख टन साखरेची निर्यात होईल असा अंदाज होता.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.