नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या लाटेसोबत आता मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. मंगळवारी देशभरात कोरोनाच्या संक्रमणात २७५ जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची ही आकडेवारी या वर्षात प्रथमच दिसली आहे.
याशिवाय मोठ्या प्रमाणावर नव्या रुग्णांचा आढळही झाला आहे. मंगळवारी ४७,२६२ नवे रुग्ण आढळले. जे गेल्यावर्षी ११ नोव्हेंबरच्या तुलनेत जास्त आहेत. मृत्यूची आकडेवारी पाहिली तर गेल्यावर्षी ३० डिसेंबरनंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत. ३० डिसेंबरला कोरोनामुळे ३०० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या आकडेवारीतील वाढ ही चिंताजनक मानली जात आहे.
भारतातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता १,१७,३४,०५८ झाली आहे. २७५ जणांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या १,६०,४४१ वर पोहोचली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की, देशभरात केंद्र सरकार सर्व राज्यांना लसीचा पुरवठा करीत आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये कोरोनाची लस मोफत उपलब्ध करून दिली आहे. खासगी दवाखान्यांमध्ये याची किंमत १५० रुपये ठेवण्यात आली आहे. खासगी रुग्णालये ही रक्कम पुन्हा सरकारकडे ऑनलाइन परत देत आहेत. आणि त्यांच्या व्यवस्थापन खर्चासाठी शंभर रुपयांपर्यंत शुल्क घेण्यास त्यांना मुभा आहे. तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ३,६८,४५७ झाली आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, मध्य प्रदेशात नवे १५०२ रुग्ण आढळले. जर एखादी व्यक्ती संक्रमित असेल तर त्यांनी बाहेर जाणे टाळावे. असेच रुग्ण आढळत राहीले तर गेल्यावर्षीसारखी गंभीर स्थिती निर्माण होईल. त्यामुळे नागरिकांनी केंद्र सरकार तसेच गृह विभागाने लागू केलेले नियम पाळावेत. राज्यात एकूण संक्रमितांची संख्या २,७८,५७७ झाली असून सर्व उत्सवांवर बंदी घातली आहे. काही ठिकाणी आठवड्याचे लॉकडाउन लागू केले जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. पंजाब सरकारही कडक उपाययोजना करीत असल्याचे लुधियानाचे उपायुक्त विरेंद्र शर्मा यांनी सांगितले. पंजाबमध्येही कोरोनाची दुसरी लाट घातक असून ४.५ टक्के इतका मृत्यूदर आहे.