नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संक्रमण गतीने होत आहे. रविवारी नवे १ लाखाहून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. लोकांमधील बेफिकीरी हे रुग्णवाढीचे कारण असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
यापूर्वी १६ सप्टेंबर २०२० रोजी देशात ९७,८९४ रुग्ण आढळले होते. रविवारी देशभरात १.०३ लाख कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
कोरोना संक्रमणाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. मात्र, लोकांमध्ये संक्रमणाविषयीची बेफिकीरी हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. देशात कोरोना व्हॅक्सिन उपलब्ध झाल्यानंतर लोकांमध्ये ही भावना वाढीस लागली आहे. संक्रमण वाढल्याचे आणखी एक कारण म्हणजे नवा स्ट्रेन आहे, जो गतीने फैलावतो. दररोज नवे रुग्ण आढळून येत आहेत. हे नव्या स्ट्रेनशी संबंधीत आहेत.
लोकांकडून सार्वजनिक ठिकाणी कोरोनाविषयक नियमावलीचे पालन होत नाही. गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. अनेकजण रस्त्यावर मास्कविना फिरताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
कोरोना संक्रमणाबाबत महाराष्ट्र सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. रविवारी महाराष्ट्रात ५७,००० रुग्ण आढळले आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ३० एप्रिलपर्यंत नाइट कर्फ्यू लागू केला आहे. तर राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे.
उत्तर प्रदेशात २४ तासात ३१ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातही कोरोनाने गती घेतली आहे. रविवारी उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला. तर पंजाबमध्ये ५१, छत्तीसगडमध्ये ३६ जणांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे. देशभरात रविवारी एकूण ४९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक २३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.