नवी दिल्ली: कोरोना महामारीची दुसरी लाट सर्वात घातक असल्याचे दिसून येत आहे. संक्रमित रुग्णांमध्ये सलग ३९ व्या दिवशी वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी अडीच लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान मृतांची संख्याही १६०० वर पोहोचली आहे. पुढच्या १२ दिवसांत कोरोन रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर १६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या एक कोटी ५० लाख ६१ हजार झाली आहे. यापैकी एक कोटी २६ लाख ५३ हजारांहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांवर आहे.
महाराष्ट्रासह १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात स्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात यांचा यामध्ये समावेश आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २६ कोटी ७८ लाख ९४ हजार ५४९ नमुने तपासण्यात आले आहेत. रविवारी १३ लाख ५६ हजार १३३ नमुने तपासले गेले.