नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अतिशय घातक बनली आहे. कोरोना जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करीत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येने भारतातील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या २४ तासात तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आणि २१०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत भारतात जगात सर्वाधिक रुग्ण आहेत.
गेल्या सात दिवसांत १८ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर त्याआधीच्या सप्ताहात १० लाखांहून अधिक रुग्ण वाढले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात ३,१४,८३५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २१०४ जणांचा कोरोनामुळे मृ्त्यू झाला. यांदरम्यान १,७९,३७२ जण बरे झाले आहेत.
कोरोनाच्या उच्चांकी रुग्णसंख्येने एक कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ चा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ८४ लाख ६५७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात संक्रमितांची संख्या २२,९१,४२८ झाली आहे.
एका दिवसात साडेसोळा लाख चाचण्या
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिवसभरात १६ लाख ५१ हजार ७११ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत २७ कोटी २७ लाख ५ हजार नमुने तपासण्यात आले आहेत.
१३ कोटी जणांचे लसीकरण
यांदरम्यान, देशात कोरोना विरोधातील लसीकरणाची मोहीम गतीने सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांना लस देण्यात आली आहे. यातील २२ लाख ११ हजार ३३४ जणांना एका दिवसात लस देण्यात आली.