नवी दिल्ली : सलग चार दिवस कोरोना संक्रमणाचे नवे चार लाख रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी देशभरात या रुग्णसंख्येत काहीशी घट झाली आहे. सोमवारी एका दिवसात ३,६६,१६१ नवे रुग्ण आढळले असून यासोबतच एकूण संक्रमितांची संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात ३७५४ जणांचा मृत्यू झाला असून एकूण कोरोना बळींची संख्या २,४६,११६ झाली आहे. देशात सध्या ३७.४५,२३७ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या एकूण संक्रमितांच्या तुलनेत १६.५३ टक्के आहे. तर संक्रमितांपैकी बरे झालेल्यांची संख्या ८२.३९ टक्के आहे. उपलब्ध आकडेवारीनुरार, १,८६,७१,२२२ जण पू्र्णपणे बरे झाले आहेत. तर मृत्यूदर १.०९ टक्के इतका आहे.
देशात २ कोटींवर कोरोना रुग्ण
भारतात गेल्यावर्षी ७ ऑगस्टरोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांवर गेली होती. त्यानंतर २३ ऑगस्टला ३० लाख, पाच सप्टेंबरला ४० लाख आणि १६ सप्टेंबरला रुग्णसंख्या ५० लाखांवर गेली होती. या जागतिक महामारीत गेल्यावर्षी २८ सप्टेंबर रोजी ६० लाख रुग्णसंख्या झाली. ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख, २० नोव्हेंबर रोजी ९० लाख तर १९ डिसेंबर रोजी एक कोटी रुग्णसंख्या झाली होती. भारतात चार मे रोजी रुग्णसंख्या दोन कोटींवर पोहोचल्याचे सांगण्यात येते.
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ३०,३७,५०,०७७ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी १४,७४,६०६ चाचण्या रविवारी करण्यात आल्या आहेत.