नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट अतिशय घातक बनली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात ३.८६ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ३४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दुसरीकडे देशात राबविण्यात येणारी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम १ मे पासून सुरू होण्यचाी शक्यता धूसर झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, बिहारसह अनेक राज्यांत एक मे पासून लसीकरण सुरू करण्यात येणार नाही. तिसऱ्या टप्प्यात १८-४४ वयोगटातील लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
२५-३० लाख डोस मिळाल्यानंतरच लसीकरण
एक मेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार आहे. मात्र, जोपर्यंत लसीचे २५-३० लाख डोस उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत हे लसीकरण सुरू केले जाणार नसल्याचे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सद्यस्थितीत दरररोज ८ लाख डोस देण्याची क्षमता राज्याची आहे. डोस खराब होण्याचे प्रमाण १ टक्क्यांवर आहे. डिस्ट्रीब्युटर्स आणि कर्मचाऱ्यांनी त्याची योग्य काळजी घेतली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार एकाचवेळी डोस खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यासाठी लसीचा साठा उपलब्ध होण्याची गरज आहे.
अनेक राज्यांची लसीकरणास असमर्थता
महाराष्ट्र वगळता मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, झारखंड, बिहार, कर्नाटक, छत्तीसगढ़, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि जम्मू-कश्मीर या राज्यांतही १ मेपासून १८ वर्षावरील लोकांना लस मिळणार नाही. लस लवकर उपलब्ध होण्याची शक्यताही नाही. उत्तर प्रदेशने ५०-५० लाख व्हॅक्सिनसाठी सीरम इन्स्टिट्यूट आणि कोवीशिल्डला ऑर्डर दिली आहे. मात्र ही पुरेशी ठरणार नसल्याने ४ कोटी डोसचे ग्लोबल टेंडर काढले जाईल.