नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या रुग्णांच्या रिकव्हरीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच कोरोनाचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांहून अधिक झाला आहे. गेल्या आठवड्यापासून नव्या रुग्णांची संख्या २० हजारांहून कमी राहिली आहे. मात्र, नव्या रुग्णसंख्येत सातत्याने बदल सुरू आहेत. दररोजच्या मृत्यूमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. आणि एक्टिव रुग्णसंख्याही निचांकी स्तरावर आली आहे.
४८ तासांत ३२ हजार नवे कोरोना रुग्ण
आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे नवे १५५९० रुग्ण आढळले आहेत. काल दिवसभरात १६९४६ रुग्ण आढळले होते. त्यामुळे गेल्या ४८ तासांत एकूण ३२ हजार नवी रुग्णसंख्या झाली आहे. जानेवारी महिन्यात दररोजची रुग्णसंख्या १२ हजारांच्या आसपास होती.
मृत्यूदरात घट
कोरोनामुळे होणाऱ्या दररोजच्या मृत्यूदरात फारसा फरक पडलेला नाही. गेल्या २४ तासांच १९१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर काल ही आकडेवारी १९८ इतकी होती. त्याआधी दिवसभरात २०२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत दररोज सर्वात कमी मृत्यू १६१ इतके झाले आहेत. देशातील कोरोना वाढीचा वेग गेल्या काही दिवसांपासून १.४४ टक्क्यांवर आला आहे.
रिकव्हरी रेट उच्च स्तरावर
कोरोना रुग्णांच्या बरे होण्यात सातत्यपूर्ण वाढ असून देशाचा रिकव्हरी रेट चांगल्या स्थितीत आला आहे. सद्यस्थितीत रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांच्या पुढे जाऊन ९६.५२ टक्के इतका झाला आहे. आता देशातील अॅक्टिव रुग्णसंख्या २ लाख १३ हजार २७ इतकी आहे.
पॉझिटिव रुग्णसंख्या दीड कोटींवर
उपलब्ध आकडेवारीनुसार देशात आजघडीला पॉझिटिव केसीसची संख्या १ कोटी ५ लाख २७ हजार ६८३ इतकी आहे. यापैकी १ कोटी १ लाख ६२ हजार ७३८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १ लाख ५१ हजार ९१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लसीकरण उद्यापासून
देशभरात शनिवार, १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. कोरोना व्हॅक्सिन कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे १.६५ कोटी डोस देशातील सर्व शहरांत पोहोचविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.