नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट भयानक वेगाने विस्तारत आहे. बुधवारी या लाटेने आतापर्यंतच्या रुग्णसंख्येचे सर्व विक्रम मोडीत काढले. गेल्या २४ तासात १.१५ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे ६३० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
कोरोना विषाणूचे नवे संक्रमित रुग्ण गतीने वाढत असल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आजअखेर दररोज आढळणारी ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. रविवारनंतर दुसऱ्यांदा एक लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. रविवारी १,०३,५५८ रुग्ण आढळले होते तर ४७८ जणांचा मृत्यूही कोरोनामुळे झाला होता.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने दहशत
आरोग्य मंत्रालयने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीने दहशत पसरली आहे. गेल्या २४ तासात सर्वाधिक १,१५,७३६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ६३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच संक्रमित रुग्णांची एकूण संख्या १,२८,०१,७८५ झाली असून कोरोनामुळे आजवर १,६६,१७७ जणांचा मृत्यू झाला आहे.
दररोजच्या रुग्णसंख्येत भारत आघाडीवर
जगात दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत भारताने अमेरिका, ब्राझिललाही मागे टाकले आहे. कोरोनामुळे सर्वात प्रभावित झालेल्या देशांमध्ये अमेरिका, ब्राझिलनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत बुधवारी ६२,२३८, ब्राझीलमध्ये ८२,८६९ रुग्ण आढळले तर भारतात १,१५,७३६ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसाला एक लाख रुग्ण आढळणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.
सक्रिय रुग्ण ८.४३ लाखांवर
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात ५९,८५६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर देशात आतापर्यंत १,१७,९२,१३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, नव्या सापडणाऱ्या रुग्णसंख्येत उपचार होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या निम्मी आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णसंख्या ८,४३,४७३ वर आली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ़, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेश, पंजाब, तमिळनाडू आणि मध्य प्रदेशात रुग्णसंख्या सर्वात जास्त आहे.
देशात ८.७० लाख लोकांनी घेतली लस
देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात ४५ वयोगटावरील सर्वांना लस दिली जात आहे. देशात आतापर्यंत ८,७०,७७,४७४ जणांनी लस घेतली आहे.