नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या रुग्णांची संख्या कमी- अधिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी दररोजची रुग्ण संख्या कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत कोविड १९चे नवे ११ हजार ८३१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना महामारीने बाधितांची संख्या १.०८ कोटींवर गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ११ हजार ८३१ रुग्ण सापडल्यानंतर एकूण रुग्ण संख्या १ कोटी ०८ लाख ३८ हजार १९४ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ८४ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील मृतांची संख्या आता १ लाख ५५ हजार ०८० झाली आहे. रविवारी एका दिवसात ७८ जणांचा मृत्यू झाला होता. या तुलनेत आज मृत्यू वाढले.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत
११ हजार ९०४ जण बरे झाले आहेत. कोरोनाचे सुरू असलेले लसीकरण आणि बरे होणाऱ्यांची संख्या सम पातळीवर आली आहे. रविवारी संक्रमित रुग्ण संख्या बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक होती.
गेल्या २४ तासांत ११ हजार ९०४ रुग्ण बरे होऊन घरी परतल्यावर कोविड १९ मधून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ०५ लाख ३४ हजार ५०५ झाली. सध्या देशात १ लाख ४८ हजार ६०९ इतके रूग्ण उपचार घेत आहेत. तर ५८ लाख १२ हजार ३६२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.