नवी दिल्ली : देशभरात कोरोना महामारीच्या स्थितीत गतीने सुधारणा होत आहे. देशात कोरोना विषाणू संक्रमाणातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचल आहे. याचबरोबर नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आणि दररोजच्या मृत्यूचा आकडाही कमी झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या नव्या रुग्णांची संख्या १३ हजार ८३ इतकी आहे. मात्र, १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयातडील अपडेटनुसार देशात कोरोनाची आजअखेर १ कोटी ७ लाख ३३ हजार १३१ जणांना लागण झाली आहे. यापैकी १ कोटी ४ लाख ९ हजार १६० जण बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे सक्रिय रुग्णही कमी झाले असून त्यांची संख्या १ लाख ६९ हजार ८२४ इतकी आहे. तर कोरोनामुळे आजअखेर १ लाख ५४ हजार १४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींची संख्या १४ हजार ८०८ झाली आहे. त्यामुळे कोरोनातून रिकव्हरीची टक्केवारी ९६.९८ वर पोहोचली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८६२ने कमी झाली आहे. यामुळे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १.५८ टक्क्यांवर आली आहे. भारतात कोरोनाचा मृत्यूदर १.४४ टक्क्यांवर आहे.
देशात १९ कोटींहून अधिक कोरोना टेस्ट
देशात कोरोनाची चाचणी करून घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत १९ कोटी ५० लाखांहून अधिक जणांनी तपासणी करून घेतली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात १९ कोटी ५८ लाख ३७ हजार ४०८ जणांची तपासणी झाली आहे. काल दिवसभरात ७ लाख ५६ हजार ३२९ जणांची तपासणी करण्यात आली.
लसीकरण मोहिमेलाही गती
देशभरात आता लसीकरण मोहिमेला गती आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३५ लाख २७ जणांना लसीकरण करण्यात आले. गेल्या २४ तासांत ५ लाख ७१ हजार ९७४ जणांना लस देण्यात आली आहे.