नवी दिल्ली : देशभरात गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. गेल्या बारा दिवसांनंतर मंगळवारी म्हणजे आज कोरोनाच्या दररोजच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४०,७१५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या संक्रमणाचे नवे ४०,७१५ रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील एकूण संक्रमितांची संख्या वाढून १,१६,८६,७९६ वर पोहोचली. यापूर्वी सोमवारी, गेल्या पाच महिन्यात सर्वाधिक ४७ हजार रुग्ण आढळले होते. तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे १९९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १,६०,१६६ झाली आहे. कोरोनाच्या दररोजच्या रुग्ण आणि संक्रमितांच्या संख्येत आज घसरण झाली. सोमवारी २१२ जणांचा मृत्यू झाला होता.
सक्रिय रुग्णसंख्या ३.४५ लाखांवर
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात २९,७८५ जण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत १,११,८१,२५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दररोजच्या नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. गेल्या काही महिन्यात मार्चमध्ये पहिल्यांदाच सक्रिय रुग्णसंख्या तीन लाखांवर पोहोचली. यापूर्वी सक्रिय रुग्णसंख्या दोन लाखांपेक्षा कमी होती. सध्या देशात ३,४५,३७७ सक्रिय रुग्ण आहेत.
सध्या देशात जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत ४,८४,९४,५९४ जणांना लस देण्यात आली आहे.