नवी दिल्ली: देशभरात कोरोना व्हायरसविरोधातील लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठ्या कोविड १९ लसीकरण मोहीमेला सुरूवात केली. अभियानात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही लस घेतली.
दिल्लीतील सफाई कर्मचारी मनीष कुमार यांना देशातील पहिली लस देण्यात आली. त्यानंतर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही लस टोचून घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. यावेळी डॉ. गुलेरिया म्हणाले, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो, हे लसीकरण सुरक्षित आणि परिणामकारक आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवावी लागेल. आपले संशोधक, वैज्ञानिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपण सुरू केली आहे.
आणि सर्वांना असा विश्वास वाटतो की मोठ्या प्रमाणावर लोकांना लसीकरण केले जाईल. जागतिक स्तरावर पसरलेल्या महामारीच्या अंताची ही सुरूवात आहे.’
देशात कोरोना व्हॅक्सिन कोविशील्ड आणि कोवॅक्सिनला मंजूरी देण्यात आली आहे. लसीकरण करून आपण आपल्या नातेवाईकांना वाचवू शकतो असा विश्वास गुलेरिया यांनी सांगितले.
पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहिमेला प्रारंभ करता सांगितले, ‘आज पूर्ण देशाला असलेली प्रतीक्षा संपली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील प्रत्येक घरातील महिला, मुले, तरुणांना कोरोना व्हॅक्सिन कधी येणार याची उत्कंठा लागली होती. आता लस आली आहे. आमचे वैज्ञानिक आणि विशेषज्ज्ञ मेड इन इंडिया असलेल्या या लसीची सुरक्षा आणि परिणाम याबाबत निश्चिंत झाले, तेव्हाच त्याच्या तातडीच्या वापराला आम्ही मंजूरी दिली.
देशातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, दुःष्प्रचाराला बळी पडू नये. आपली आरोग्य व्यवस्था जागतिक स्तरावर मजबूत, विश्वसनीय असल्याचे यातून दिसून आले आहे.