नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची गती विलक्षण वाढली आहे. सद्यस्थितीत यात घट होण्याची शक्यता कमीच आहे. नवे रुग्ण गतीने आढळत असून मृतांची संख्याही दोन हजारांवर पोहोचली आहे. गेल्या एका दिवसात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत २.९५ लाख सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तर २ हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. ज्यादातर नवे रुग्ण दहा राज्यांतच आढळून येत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत स्थिती गंभीर आहे. सर्वाधिक नवे रुग्ण याच राज्यांत सापडले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात कोरोना संक्रमणामुळे विक्रमी २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ९५ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता देशात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० झाली आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या २१ लाख ५७ हजार ५३८ झाली आहे. तर एकूण १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ जण पूर्णपणे बरे झाले आहेत.
मृत्यू दरात सातत्याने घसरण
कोरोना महामारीमुळे आतापर्यंत एकूण १ लाख ८२ हजार ५५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या उच्चांकी मृत्यूसंख्येनंतरही मृत्यूदरात घट दिसून आली आहे. सध्या हा दर १.१७ टक्के आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दुसरी लाट कमी घातक आहे. मात्र, संक्रमितांची संख्या अधिक आहे. तुलनेने मृत्यू कमी होत आहेत.
मंगळवारी १६ लाख चाचण्या
देशभरात कोरोना चाचण्यांची गती वाढली आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी १६ लाख ३९ हजार ३५७ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशात एकूण २७ कोटी १० लाख ५३ हजार ३९२ नमुने तपासण्यात आले आहेत.