नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटने आर्थिक सुधारणांचा वेग कमी झाला आहे. राज्यांतील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन लागू केले जात आहे. त्यामुळे उत्पादन घटले असून बेरोजगारी वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयईई) दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली आहे. सीएमआयईच्या रिपोर्टनुसार ११ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात शहरी बेरोजगारी वाढून ९.८१ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर २८ मार्च रोजी संपलेल्या महिन्यात हा दर ७.४२ टक्के होता.
दरम्यान राष्ट्रीय बेरोजगारी दर ८.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. २८ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात तो ६.६५ टक्के होता. याच पद्धतीने ग्रामीण बेरोजगारी दर ६.१८ टक्क्यांवरून वाढून ८ टक्क्यांवर आला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अनेक राज्यांनी शहरात अंशतः लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे.
यामुळे वाढली बेरोजगारी
तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम शहरी रोजगारीवर पहायला मिळत आहेत. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यांत अंशतः लॉकडाऊन लागू केला गेला होता. तर नाइट कर्फ्यूही लावला होता. दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरात मॉल, रेस्टॉरंट, बारसारख्या जागांवर कोरोनाच्या नियमांचे पालन कडक केल्याने शहरी रोजगार घटला. आणखी काही दिवसात यात वाढ होण्याची शक्यता आहे.
कामगार परतल्याने स्थिती बिघडली
कोरोनाच्या संकटात गेल्यावर्षी अनेक प्रवासी मजूर घरी परतले होते. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसत असताना पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लोक नोकऱ्या सोडून लॉकडाऊनपूर्वी घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे बेरोजगारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उत्पादन घटले, महागाई वाढली
कोरोनामुळे मॅन्युफॅक्चरींग आणि खणीकर्म क्षेत्रातील कामगिरी निराशाजनक आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादन घटले आहे. खाद्यपदार्थ महागल्याने किरकोळ महागाई दर मार्चमध्ये वाढून ५.५२ टक्क्यांवर पोहोचला. तर बेरोजगारी वाढल्याने आर्थिक स्थिती बिघडली आहे.