कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये मिळावा या मागणीसाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग १० तास रोखून धरला होता. यावेळेस झालेल्या चर्चेनुसार तातडीने साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यास तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव व ऊस दर नियंत्रण समितीचे अध्यक्ष नितीन करीर यांच्याकडे केली.
आंदोलनादरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्याशी या विषयावर सकारात्मक चर्चा झाली होती. गेल्या हंगामात ज्या साखर कारखान्यांनी ३००० रुपयांपेक्षा कमी दर दिला, त्यांनी प्रती टन १०० रुपये व ज्या कारखान्यांनी ३००० रुपयांपेक्षा जादा दर दिला, त्यांना प्रती टन ५० रुपये देण्याचा तोडगा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य केला आहे. शासनाकडून दोन महिन्यांत परवानगी घेऊन हा दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांना कारखानदारांनी दिले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे.