ऊसाची बिले मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

बस्ती : चीनी मंडी
उत्तर प्रदेशात २०१५ पासून थकीत असलेल्या ऊस बिलांच्या पूर्तता व्हावी या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील ही घटना असून येथील वाल्टरगंज साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. याप्रश्नी १०० ते १५० शेतकरी, साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करीत आहेत.
या शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणाही केली आहे. मंगळवारी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी बिलांची थकबाकी तत्काळ देण्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आणि त्यांचा पुतळाही जाळला. बुधवारी याबाबत सात अल्पवयीन मुलांसह ३० शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धरणे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या राम प्रकाश चौधरी यांनी ‘गुन्हे दाखल झाले म्हणून आम्ही मागे हटणार नाही. पोलिसांनी हवे तर आम्हाला अटक करावी. आंदोलन थांबविणार नाही, अशी घोषणा केली.
उत्तर प्रदेशातील बस्ती हा जिल्हा ऊसाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. इथला मुख्य रोजगार शेती असून ऊस शेतीला प्राधान्य आहे. जिल्ह्यात तब्बल चार साखर कारखाने आहेत यावरुन या जिल्ह्यातील उसाच्या शेतीचा अंदाज केला जाऊ शकतो. यापैकी वॉल्टरगंज साखर कारखान्याने परिसरातील ६० हजार ऊस उत्पादकांचे ४९ कोटी रुपये थकवले आहेत. २०१५ पासूनची ही थकबाकी आहेत. ऊस बिले मिळावीत अशी मागणी गेली तीन वर्षे शेतकरी करीत आहेत. मात्र, आजवर कारखान्याने याकडे दुर्लक्ष केले. सरकारनेही यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत.
लोकसभा निवडणुकीच्या दहा दिवस आधी जिल्हा परिषद सदस्य राम प्रकाश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५० शेतकरी वॉल्टरगंज साखर कारखान्याच्या दारात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या जोडीला कारखान्याचे कर्मचारीही आंदोलनात उतरले आहेत. आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. तशा निर्णयाचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने थकबाकी देण्यासाठी १५ एप्रिलची डेडलाइन दिली होती. मात्र, या मुदतीत बिले न मिळाल्याने १६ एप्रिलपासून शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदी यांचा पुतळाही जाळला. याविरोधात वॉल्टरगंज पोलिस ठाण्यात राम प्रकाश चौधरी, शत्रुघ्न सिंह, हरिराम, अंगद, मनिराम, वीरेंद्र, चेतराम यांच्यासह ३० शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here