नवी दिल्ली : सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे ही शक्यता निर्माण झाली आहे. ब्रेंट क्रूडने सध्या ६ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्याची स्थिती मागणीपेक्षा जास्त झाली आहे आणि अमेरिकेकडून भविष्यातही मागणी कमी राहण्याची शक्यता आहे. सध्या क्रूडचे दर प्रति बॅरल $75 च्या खाली आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांनी संकेत दिले आहेत कि, तेल प्रति बॅरल $80 च्या खाली स्थिर राहिल्यास किमतींचा आढावा घेणे शक्य आहे.
कच्चे तेल कुठे पोहोचले?
मंगळवारी कच्चे तेल प्रति बॅरल सुमारे 3 डॉलरने घसरले आणि ते 73.5 डॉलरच्या खाली पोहोचले. ट्रेडिंग दरम्यान, ब्रेंट 73.08 च्या पातळीवर आला, जी 6 महिन्यांतील क्रूडची सर्वात नीचांकी पातळी आहे. त्याच वेळी, यूएस डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली घसरले. महागाईची आकडेवारी समोर आल्यानंतर क्रूडची घसरण आणखी वाढली आहे. महागाईचा दर अपेक्षेप्रमाणे राहिला आहे. दुसरीकडे, 2024 मध्येही तेलाची मागणी कमी राहण्याचे संकेत आहेत. सध्या बाजाराची नजर या आठवड्यात OPEC आणि IEA वर असेल, दोघेही या आठवड्यात त्यांचे अंदाज अपडेट करतील.
बाजार इतर अनेक संकेतांवरही लक्ष ठेवून आहे. अमेरिकेच्या क्रूड स्टॉकचे आकडेही येणार आहेत, यासोबतच इस्रायल-हमास संघर्षादरम्यान येमेनजवळून जाणाऱ्या क्रूडने भरलेल्या जहाजावर हल्ला झाल्याच्या वृत्तानेही बाजार सावध झाला आहे. हे हल्ले आणखी वाढले तर पुरवठ्यावर परिणाम होऊन किमतींवर परिणाम होऊ शकतो.
भारतावर काय परिणाम होईल?
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. अनेक दिवसांपासून तेल कंपन्यांनी दरात बदल केलेला नाही. तेल कंपन्या सध्या दर स्थिरतेच्या प्रतीक्षेत आहेत. कंपन्यांनी सूचित केले आहे की, तेल प्रति बॅरल $80 च्या खाली स्थिर झाल्यास दरांचा आढावा घेणे शक्य आहे. OPEC देशांनी आधीच सांगितले आहे की $80 ते $100 ची पातळी त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे आणि ते या पातळीवर किंमती राखण्याचा प्रयत्न करत आहेत. किमतींबाबतची ही अनिश्चितता पाहता तेल कंपन्या कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. सध्या जे संकेत मिळत आहेत त्यावरून असे दिसते आहे की, किमती कमी राहतील आणि असे झाल्यास त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर दिसू शकतो.