चिनी मंडी, कोल्हापूर: सोमवारी जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम खनिज तेलावर होऊन त्याच्या भावात घसरण झाली. त्यामुळे खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल काल ७१.६० डॉलर इतका झाला. विश्लेषकांच्या अंदाजानुसार इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधामुळे येणाऱ्या काळात तेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
चीनमधील औद्योगिक उत्पन्न देखील घटले असून, तुर्कस्तानमुळे कमोडिटीजच्या भावांना फटका बसला आहे. त्याचबरोबर जगातील विकसनशील अर्थव्यवस्थांबाबत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. अश्या परिस्थितीत खनिज तेलाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलाच्या भावात घसरण होऊ लागली आहे.
तेलाच्या भावात जरी घट झाली असली तरी ते येणाऱ्या काळात वाढतील तसेच अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणकडून होणारा तेलपुरवठा नोव्हेंबरपासून कमी होण्याची शक्यता आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.