नवी दिल्ली : देशात सलग ७८ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी २२ मे रोजी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी इंधन दरात कपात केली होती. तर २१ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल ६ रुपये आणि डिझेल ८ रुपयांनी स्वस्त केले होते. त्यावरील एक्साइज ड्युटी कमी करण्यात आली होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे देशातही पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मात्र सध्याही पेट्रोल विक्रीत १० रुपये प्रती लिटर तोटा होत असल्याचे ऑईल मार्केटिंग कंपन्यांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पाहिले तर कच्च्या तेलाचे दर डब्ल्यूटीआय क्रूड ८८.३५ डॉलर प्रती बॅरलवर आले आहेत. तर ब्रेंट क्रूडचे दर ९४.२४ डॉलर प्रती बॅरलपर्यंत घसरले आहेत. देशातील चार महानगरांतील दरांकडे पाहिल्यास दिल्लीत आज पेट्रोल ९६.७२ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटरने विक्री केले जात आहे. चेन्नईत १०२.६३ रुपये प्रती लिटर दराने पेट्रोल आणि ९४.२४ रुपये दराने डिझेल मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात आहे.