कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांना यंदाचा गाळप हंगाम फारसा सोपा नाही. प्रलंबित एफआरपी, सरकारी देणी देण्यास विलंब या कारणांसाठी कोंल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 14 कारखान्यांचे गाळप परवाने होल्डवर ठेवण्यात आले आहे. ज्या कारखान्यांना परवाना मिळालेला नाही, त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीत ऊस न पाठवण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.
प्रलंबित असलेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीचा उदयसिंह गायकवाड साखर कारखाना, रिलायबल शुगर अॅन्ड डिस्टिलरी, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, गडहिंग्लज साखर कारखाना, दौलत साखर कारखाना, महाकाली साखर कारखाना तर सांगलीतील यशवंत शुगर अॅन्ड पॉवर प्रा.लि., राजारामबापू पाटील साखर कारखाना, माणगंगा साखर कारखाना यांचा समावेश आहे. यातील काही कारखान्यांकडे गेल्या हंगामातील 73 कोटी रुपयांची देणी थकीत आहे. याशिवाय काही कारखान्यांची 16-17 च्या हंगामातीलही काही देणी थकीत आहेत. या कारखान्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हरकती नोंदवल्या असून आता एफआरपी दिल्याशिवाय त्यांना कारखाने सुरु केले जावू नयेत, जर सुरु करण्यात आलेच तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याबाबत 23 तारखेला संघटनेची ऊस परिषद आहे. तर 25 तारखेला कारखानदार व संघटनेची ऊस दराबाबत पुन्हा बैठक होणार आहे. सध्या ऊस कमी आहे. त्यामुळे जर त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्यांनी ऊसच पाठवला नाही तर कारखान्यांची कोंडी होवू शकते, असे माजी खास राजू शेट्टी म्हणाले.