पुणे : महाराष्ट्रात २०२०-२१चा साखर हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कोल्हापूर, नांदेड, सोलापूर विभागातील सर्व साखार कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. इतर विभागातील कारखानेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आता पुणे विभागातील सर्व कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. राज्यात ११ मे २०२१ अखेर १८४ साखर कारखाने बंद झाले आहेत.
पुणे विभागाचा विचार केल्यास, या हंगामात ३१ साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. सध्या सर्व कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागात २३०.५५ लाख टन उसाचे गाळप झाले असून २५२.७० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या हंगामात येथील साखर उतारा ११ टक्क्यांच्या आसपास आहे. सध्या येथील साखर उतारा १०.९६ टक्के नोंदविला गेला आहे.
साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, ११ मे २०२१ पर्यंत राज्यात १९० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात १०११.३१ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०६१.१८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४९ टक्के इतका आहे.